
सामना प्रतिनिधी । बीड
‘आंदोलनाच्या दरम्यान मराठा समाजातील ६ तरूणांनी आत्महत्या केल्या ही घटना अतिषय दुःखदायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. माझी महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरूणांना नम्र विनंती आहे की आपले अमूल्य जीवन संपवू नका, तुम्हीच खरे वारसदार आहात’, अशी कळकळीची विनंती करत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठोस भूमिका व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन लोकशाही मार्गाने व्हावे परंतू आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तरूण वर्गाला आवाहन करून दिलासा द्यावा या भूमिकेतून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी या आंदोलनात तरूणांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘तरूण बांधवांनो आत्महत्या करू नका, आपले अमूल्य जीवन संपवू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे त्यावेळी आपण नसणार ही बाब योग्य नाही. आपली आपल्या कुटूंबाला गरज आहे. कुटूंबाला पोरके करू नका, समाजाला आणि देशाला आपली गरज आहे. आपणच भावी आधारस्तंभ असून वारसदार आहात. आत्महत्या ही अतिषय दुःखद घटना असून मन हेलावून टाकणारी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर रयतेसाठी प्रचंड संघर्ष केला, संकटांवर मात केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे रक्षण केले. महाराजांना जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला. विपरीत परिस्थितीत लढावे लागले, अनेकदा जीवावर प्रसंग बेतले परंतू हा शूर मराठा कधी डगमगला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची क्षणोक्षणी आठवण ठेवा व आपले बहूमूल्य जीवन सांभाळा. आरक्षणाचा लाभ आपल्याला व आपल्या कुटूंबाला मिळणारच आहे ते पाहण्यासाठी आपण आम्हाला हवे आहात’, अशी कळकळीची विनंती क्षीरसागर यांनी मराठा समाजाला केली.


























































