
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिकेकडून निविदेद्वारे कंत्राट घेणाऱ्या एका खासगी वाहतूक व्यवसायाला धमकावून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्ता आणि ‘थेट संवाद’ साप्ताहिकाचा संपादक दिलीप हजारे याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. साडेतीन लाखांचा हप्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
विश्वासराव (नाव बदललेले) यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. पालिकेच्या देवनार कत्तलखान्यातील कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये फेकायचे कंत्राट विश्वासराव यांना मिळाले होते. मे२०१८ मध्ये दिलीप हजारे याने त्यांना संपर्क शोधून स्वतःची ओळख ‘थेट संवाद’चा संपादक व माहितीचा अधिकार कार्यकर्ता असल्याची सांगितली. तुमच्या कंत्राटाबाबत माहिती मिळवली असून तुम्ही पालिकेची दिलेल्या बिलांमध्ये तफावत असल्याचे सांगितले. तुमचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला लावतो, कारवाई करायला सांगतो अशी धमकी देत हजारेने विश्वासराव यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली.
विश्वासराव यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजय चव्हाण व पथकाने हजारेवर पाळत ठेवली. त्यानंतर पवई येथे सापळा लावून विश्वासराव यांच्याकडून साडेतीन लाखांचा पहिला हप्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडले.






























































