
सामना ऑनलाईन, मुंबई
जवळपास ३ आठवडे महाराष्ट्रात पावसाने दडी मारली असून यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचे हवामानतज्ञ महेश पालावत यांनी हीच परिस्थिती ऑगस्ट महिन्यातही कायम राहणार असल्याचं सांगितल्याने ही चिंता आणखी वाढणार आहे. पालावत यांनी सामना ऑनलाईनशी बोलताना सांगितले की ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत राहील मात्र तो येऊन जाऊन अशा स्वरुपातील असेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑगस्ट महिना चिंताजनक असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
ऑगस्ट कोरडा राहील मात्र सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस राज्याच्या अनेक भागांना दिलासा देऊ शकेल अशी सध्या परिस्थिती असल्याचं महेश पालावत यांनी म्हटलं आहे. सप्टेंबरच्या पावसाबाबत आत्ताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही कारण ऑगस्ट महिना संपेपर्यंत परिस्थिती बदलूही शकते असं त्यांनी म्हटलं आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र सध्यातरी चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.




























































