
राजेंद्र वाडेकर, राहुरी
एकीकडे बोंडअळीचा प्रार्दुभाव झालेला असतानाच दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामुळे कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी चहुबाजूने वाढल्या आहेत. तालुक्यातील बारागाव नांदुर या शाश्वत पाण्याच्या पट्ट्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कपाशीच्या लागवडी झाल्या आहेत. मात्र २ महिन्याचा कालावधी उलटला असताना कपाशीची पिके अवघी ३ फुटापर्यंत वाढली आहेत. तर कपाशीला समाधानकारक फुटवे देखील नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदा आला आहे.
मागील वर्षी कपाशीच्या झाडांची ५ फुटापर्यंत वाढ होऊन मोठ्या प्रमाणात फुटवे निघाले होते. ६ महिन्याच्या कपाशीनंतर राहुरी तालुक्यात गहु किंवा कांदा हे दुबार पिक घेतले जात असल्याने १५ मे नंतर कपाशीच्या लागवडी करण्याचे या भागातील शेतकऱ्यांचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. लागवडीनंतर पावसाने मारलेली दडी ही कपाशी पिकाची वाढ खुंटवणारी ठरली आहे.
महिन्याभरापूर्वी पावसाचे वातावरण निर्मिती झाल्याने शेतकऱ्यांनी विहीरीत पाणी उपलब्ध असताना ही कपाशीचे पिक उफाळून जाईल या भीतीने कपाशीच्या पिकाला पाणी दिले नाही. कपाशीची वाढ खुंटल्याने यंदा उत्पादनात घट होणार असल्याची खात्री शेतकऱ्यांना झाली आहे. त्यातच पूर्व भागातील कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने बोंडअळीचे हे आक्रमण येण्याच्या भीतीने बारागाव नांदुर पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने कपाशीच्या पिकावर झालेला खर्च यंदा फिटणार ? ही खात्री शेतकऱ्यांना राहिलेली नाही.




























































