
सामना प्रतिनिधी । मुंबई
बसस्टॉपवर बसची वाट बघून कंटाळलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बसगाडी कुठे आहे आणि किती वेळात येईल याची अचूक माहिती प्रवाशांना देण्यासाठी सर्व गाडय़ांवर ‘जीपीएस’ यंत्रणा लावण्यात येणार आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी बेस्ट दिनाच्या पूर्वसंध्येला दिली.
उद्या दि. ७ ऑगस्ट रोजी बेस्टचा वर्धापन दिन साजरा होणार असून त्यानिमित्ताने येत्या काळात बेस्टला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याबाबत अध्यक्ष चेंबूरकर यांनी माहिती दिली. गेल्या काही वर्षांत रस्त्यावर खासगी गाडय़ांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच ‘ओला’, ‘उबर’सारख्या सेवा, शेअर टॅक्सी, रिक्षा यामुळे वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे बसगाडय़ा वेळेवर पोहचू शकत नसल्यामुळे प्रवासी बेस्टकडे पाठ फिरवू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यात बसगाडय़ांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्याबरोबरच बसस्टॉपवर बसच्या येण्याच्या वेळाही दिसू शकतील अशी सोय करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.
तंबाखू सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
तंबाखूमुक्त बेस्ट उपक्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. यासंदर्भात एक मोबाईल ऍपदेखील तयार करण्यात आले असून दादरच्या कार्यशाळेत व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच या वर्षी सुमारे ६०० कर्मचाऱयांना तंबाखू सोडण्यास मदत करणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात यशस्वी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उद्या बेस्ट दिनी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आशीष चेंबूरकर यांनी दिली.
शिवसेना विभाग क्रमांक २ चे नवनियुक्त विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि विभागसंघटक विशाखा मोरये यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सोबत मधुकर राऊत, अशोक पटेल.



























































