मेट्रो कामाचा अग्यारींवर होणारा परिणाम तपासण्यासाठी वेळ द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मेट्रोच्या खोदकामाचा दक्षिण मुंबईतील दोन अग्यारींवर परिणाम होत असून या हेरीटेज वास्तूंचे नुकसान टाळण्यासाठी व्हीजेटीआय या संस्थेला बोगद्याच्या खोदकामाचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. या कामाचा अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. परंतु हा अहवाल सादर करण्यासाठी आणखी वेळ हवा आहे अशी विनंती सरकारच्या वतीने खंडपीठासमोर करण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने आणखी काही दिवसांचा अवधी देत १३ ऑगस्टपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली. तोपर्यंत येथील खोदकामावर बंदी कायम राहणार आहे.

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी येथील पारशींचे धार्मिक स्थळ असलेल्या अग्यारींच्या दिवाळाला तडे गेले आहेत. त्यामुळे मेट्रोचे काम थांबविण्यात यावे याकरिता काही पारशींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.