
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे झालेल्या मुंबईतील स्मिता कुसुरकर खून प्रकरणी एका संशयित आरोपीला मुंबई येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या संशयिताला देवरुख न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उमेश उर्फ आबा जगन्नाथ भोसले (३३ वर्षे ) असे या संशयित आरोपीचे नांव असून उमेश याने सदर महिलेच्या खूनाची सुपारी दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत परेल, मुंबई येथील स्मिता चंद्रकांत कुसुरकर या महिलेचा मृतदेह खून करुन पाण्यात टाकण्यात आला होता. ही घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी माभळे येथीलच श्रीकांत घडशी याच्यावर पोलीसांनी भ्रमणध्वनीवरील कॉल रेकॉर्डचा धागा पकडत त्याला ताब्यात घेतले होते. श्रीकांत घडशी याने आपण स्मिता कुसुरकर यांचा खून केला असल्याची कबूली पोलीसांजवळ दिली होती. यावरुन श्रीकांतवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रीकांत याने जमीन खरेदी करुन देतो अशी बतावणी केली होती. खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या पैशांचे बिंग फुटेल या भीतीने श्रीकांतने स्मिता कुसुरकर यांचा खून केला. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करीत असतांना श्रीकांतने दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने याच गुन्ह्यात उमेश उर्फ आबा भोसले याचे नांव पुढे आले. यावरुन संशयित आरोपी म्हणून पोलीसांनी सापळा रचून उमेश याला मुंबई येथून ताब्यात घेतले. उमेश हा सध्या चेंबूर येथे राहात असला तरी त्याचे मूळ गांव पाचेगाव खुर्द ता. सांगोला जि. सोलापूर असे आहे. उमेशला ताब्यात घेतल्यामुळे या खून प्रकरणी आणखी काही धागेदोरे पोलीसांच्या हाती लागणार आहेत.






























































