
सामना ऑनलाईन । मोरातुवा
श्रीलंका दौऱयावर असलेल्या हिंदुस्थानच्या कुमार (१९ वर्षांखालील) संघाने चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या कुमार संघाचा १३५ धावांनी धुव्वा उडविला. देवदत्त पाडिक्कल, कर्णधार आर्यन जुयल, यश राठोड यांची अर्धशतके आणि त्यानंतर झालेली टिच्चून गोलंदाजी हे हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. या विजयासह हिंदुस्थानने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली.
हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाकडून मिळालेल्या २७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ३७.२ षटकांत केवळ १४३ धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यांच्याकडून नावोद परानविथाना (४५), कर्णधार निपून धनंजया (३६) व मुदिथा लक्षण (१८) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. हिंदुस्थानकडून आयुष बदोनी व हर्ष त्यागी यांनी ३-३ फलंदाज बाद केले, तर आकाश पांडे, सिद्धार्थ देसाई व अथर्व तायडे यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानच्या कुमार संघाने ६ बाद २७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात देवदत्त पाडिक्कल (७१) अथर्व तायडे (२०), पवन शाह (३६), कर्णधार आर्यन जुयल (६०), यश राठोड (५६) व समीर चौधरी (नाबाद २४) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. श्रीलंकेकडून अविष्का लक्षण व संदून मेंडीस यांनी २-२ बळी टिपले. आता निर्णायक पाचवा सामना शुक्रवार, १० ऑगस्टला होईल.





























































