
सामना ऑनलाईन । मुंबई
इंग्लंडमधील पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा संघ पराभूत झाला. पण या कसोटीत दोन्ही डावांत कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजीने आपला ठसा उमटवला. यावर महेंद्रसिंग धोनी याला विचारले असता तो म्हणाला, विराट कोहलीने गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून यामुळे तो लिजंड खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसलाय.
प्रतिस्पर्ध्यांचे २० फलंदाज बाद केल्यानंतरच कसोटी सामना जिंकता येतो. तुम्ही किती धावा उभारता किंवा पाच दिवसांमध्ये किती चांगला खेळ करता याला महत्त्व नाही, असे महेंद्रसिंग धोनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला. रन ऍडम या क्रीडाविषयक इकोसिस्टीम कंपनीतला २५ टक्के हिस्सा यावेळी महेंद्रसिंग धोनीने घेतला.
– इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया वन डेत पंचांकडून चेंडू घेतल्यामुळे महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार या चर्चेला उधाण आले होते. पण यावेळी त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, आमच्या गोलंदाजांचे चेंडू रिव्हर्स स्विंग होत नव्हते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच वातावरणात चेंडू रिव्हर्स स्विंग केले. त्यामुळे पंचाकडून चेंडू मिळण्याची परवानगी घेत होतो. जेणेकरून आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला तो देता येईल. कारण पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. याआधी आम्हाला सज्ज राहावे लागणार आहे.




























































