
विजय जोशी । नांदेड
आंदोलन, मोर्चा, निदर्शने या माध्यमातून मागण्या समोर ठेवणे व त्यासाठी लक्ष वेधणे हा सर्वांना दिलेला लोकशाहीचा अधिकार असला तरी त्यासाठी कायदा हातात घेवून जनतेला वेठीस धरणाऱ्यांची गय करणार नाही, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिला.
नांदेड येथे यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या फत्तेसिंह पाटील यांनी काल नांदेड परिक्षेत्राचा विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार घेतला. कुठलीही न्याय मागणी मंजूर करुन घेण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन, निदर्शने, मोर्चा हे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत. मात्र यासंदर्भात हुल्लडबाजी करुन, गाड्यावर दगडफेक करुन, पोलिसांवर हल्ले करुन कायदा हातात घेणाऱ्या मंडळींना हा निर्वाणीचा इशारा असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी बसेसमध्ये प्रवास करणारे कोण आहेत, भाज्या विकणारे, दुध विकणारे, व्यवसाय करणारे कोण आहेत, तुमच्या आमच्यातील सर्वसामान्यच ना? असा सवाल करुन शाळेत जाणारी मुले, महाविद्यालयात जाणारी मुले, सरकारी कार्यालयात जाणारे नागरिक हे देखील आपल्यातीलच आहेत, त्यांना त्रास देणे हे योग्य नाही. यासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील सुसंवाद महत्वाचा असून, आजच चारही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जावून पोहंचतील आणि प्रत्येकाशी सुसंवाद निर्माण करतील. एकमेकांच्या ओळखी झाल्या, गाठीभेटी झाल्या की परिचय वाढतो, त्यामुळे सलोख्याचे वातावरण होते. हिच भूमिका माझ्या या कार्यकाळात सर्वांना दिसेल. मात्र असे होत असताना कोणी कायदा हातात घेवून हिंसचार घडवून आणणार असेल तर त्याची मात्र गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांशी संपर्क साधत आहोत. बंद शांततेत व्हावा, यासाठी नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चारही जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. हे होत असताना कायदा हातात घेवून कोणी हिंसाचार घडवून आणणार असेल, सर्वसामान्यांना सळो की पळो करुन सोडणार असेल, त्यांची मात्र गय केली जाणार नाही. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राज्य राखीव दल, होमगार्ड, जलद कृती दल यांची मदत घेतली जाणार आहे. सर्व बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे, असेही फत्तेसिंह पाटील म्हणाले.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या व वातावरण बिघडविणाऱ्या मंडळींवर आमचा वॉच आहे, आता प्रत्येक व्हॅटसअप ग्रुपमध्ये एक पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आम्ही घेतला आहे. याउपरही काही गोपनिय माहिती मिळाल्यास जनतेने थेट माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्यात सुसंवाद असावा, मात्र कोणतेही गैरकृत्य करणाऱ्या मंडळींना आम्ही खपवून घेणार नाही, आमच्याकडे आलेल्या तक्रारी त्याची शहानिशा करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करु, असा कडक इशाराही त्यांनी दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहिली पाहिजे, यासाठी नांदेड परिक्षेत्रात सर्व पातळीवर प्रयत्न करु, असेही फत्तेसिंह पाटील म्हणाले.
































































