
सामना ऑनलाईन, मुंबई
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी १० वाजता मीरा रोड येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मेजर राणे यांचे पार्थिव श्रीनगरवरून दुपारी सवादोन वाजता विमानाने दिल्लीत आणण्यात आले. तेथे त्यांना लष्कराने मानवंदना दिली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता त्यांचे पार्थिव मुंबईला विमानाने रवाना झाले. मुंबई विमानतळावर सायंकाळी ६.३०च्या दरम्यान ते पोहोचले. मालाड येथील लष्कराच्या शवागृहात मेजर राणे यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून उद्या गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मीरा रोड येथील यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. तेथे सकाळी ६ ते ९ अंत्यदर्शनानंतर सकाळी १० वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील.
कौस्तुभ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही; शिवसेना तुमच्या पाठीशी
कौस्तुभ यांच्या शौर्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे सांगतानाच शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा धीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहीद मेजर कौस्तुभ यांचे वडील प्रकाश राणे यांना दिला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज राणे कुटुंबीयांची भेट घेतली. सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून शहीद मेजर कौस्तुभ यांचे वडील प्रकाश राणे यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणे परिवाराचे सांत्वन केले. ते पुढे म्हणाले, मेजर कौस्तुभ यांच्या शौर्याला माझ्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी मानवंदना देतो. संपूर्ण शिवसेना परिवार हा सदैव तुमच्या पाठीशी आहे. कौस्तुभ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांचा पराक्रम पुढच्या पिढय़ांसमोर राहावा यासाठी त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक मीरा-भाईंदरमध्ये उभारण्यात येईल.

































































