भांडुप येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड,ऐन गर्दीत सात लोकल रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-local-11
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

गेले काही दिवस मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड उत्पन्न होत असल्याने सकाळी कामावर जाणाऱया प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बुधवारी कर्जत फास्ट लोकलमध्ये भांडुपनजीक झालेल्या तांत्रिक बिघाडाने सात लोकल ट्रेन रद्द तर ४८ लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. परिणामी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना लेटमार्कचा फटका बसला.

एरवी मध्य रेल्वेवर ट्रक आणि सिग्नल बिघाडाने लोकलचे वेळापत्रक बिघडत असते. परंतु महिनाभरापासून लोकलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उत्पन्न होऊन लोकल सेवा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी कर्जतहून सुटलेल्या जलद लोकलमध्ये भांडुप आणि कांजूरमार्गदरम्यान अचानक बिघाड निर्माण होऊन जलद मार्ग ठप्प झाल्याची घटना सकाळी ८.१२ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून वळविण्यात आल्याने धिम्या मार्गावरही लोकलच्या रांगा लागल्या. सकाळी ८.४८ वाजेपर्यंत ही लोकल ट्रकवरून काढण्यात यश आले नव्हते. त्यानंतर संबंधित लोकल कारशेडला नेण्यात यश आले. तोपर्यंत सकाळी पिकअवर असल्याने लोकल सेवेची पुरती वाट लागली. गेल्या महिनाभरातील मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बिघाड होऊन वेळापत्रकाची दैना होण्याची ही चौथी की पाचवी घटना आहे.

उंबरमाळीजवळ ओव्हरहेड वायर तुटली

उंबरमाळी स्थानकाजवळ आज संध्याकाळी भरगर्दीच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मेल, एक्सप्रेस गाडय़ा उंबरमाळी ते खर्डी दरम्यान बराच वेळ रखडल्या. दुरुस्तीनंतर रात्री पावणे आठच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली. ती दुरुस्त करण्यासाठी दोन तास लागले. तोपर्यंत गोरखपूर, नंदीग्राम, लखनौ, दुरांतो या एक्सप्रेस गाडय़ांसह दोन लोकल गाडय़ाही रखडल्या. सिग्नलमध्ये बिघाड, रूळ तुटणे यांसारख्या घटना वारंवार घडत असून त्यामुळे लाखो प्रवाशांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केला.