
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. संकंटात असलेल्यांची माहिती घेऊन त्या त्यांना त्यांच्या मंत्रालयाकडून शक्य ती सर्व मदत पुरवतात. काहीवेळा खोडकर नेटकरी त्यांचा किंवा त्यांच्या मंत्रालयाचा काहीच संबंध नसलेले प्रश्नही त्यांना विचारतात. मात्र, सुषमा स्वराज अशा प्रश्नांनी गोंधळत नाहीत किंवा चिडतही नाहीत. त्या तितक्याच शांतपणे समोरच्या व्यक्तीला टोला हाणतात. नुकताच सोशल मीडियावर सुषमा यांना असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचा त्यांच्याशी किंवा त्यांच्या मंत्रालयाशी काहीही संबंध नव्हता. पण त्यांनी तो प्रश्न सुरेख टोलावला.
सुशील केआर राय यांनी ट्वीट करून सुषमा यांना विचारले की, ११ ऑगस्टपासून १७ ऑगस्टपर्यंत बाली बेटांवर पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला आहे. तर या कालवधीत बालीला जाणे योग्य आहे काय? सरकारकडून याबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत काय? सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी? यावर सुषमा यांनी उत्तर दिले ” याबाबत मला ज्वालामुखीशी बोलावे लागेल. ज्वालामुखीशी चर्चा केल्यावर मी तुम्हाला याबाबत अधिक माहिती देईन.”
I will have to consult the volcano there. https://t.co/bv2atzWtZg
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 8, 2018
इंडोनेशियामध्ये २८ जूनला माउंट आगुंग डोंगरावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली होती. परिसरात राखेचा थर तयार झाला होता. त्यामुळे सुरक्षिततेसाठी बाली विमानतळ बंद करण्यात आला होता. त्यामुळे २३९ देशातंर्गत आणि २०७ आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. हा डोंगर पर्यटन स्थळांपासून दूर आहे. त्यामुळे पर्यटनावर काहीही परिणाम झाला नाही. तरीही खोडकर नेटकऱ्याने याबाबत सुषमा यांना सवाल केला. त्यावर सुषमा यांनी तेवढ्याच मिश्कीलपणे या ट्वीटला उत्तर दिले.
























































