
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयामध्ये आता कर्करुग्णांवरील शस्त्रक्रिया लेझर यंत्रणेद्वारे करणे शक्य होणार आहे. कान-नाक-घसा तसेच तोंडातील कर्करोगांवर शस्त्रक्रियेसाठी ल्युमिनस लेझर मशीन कूपरमध्ये आणण्यात आले आहे. ही लेझर मशीन असलेले कूपर हे मुंबईतील दुसरे महानगरपालिका रुग्णालय आहे.
कूपरचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत मशळ आदी उपस्थित होते. महापालिकेच्या फक्त केईएम रुग्णालयातच ल्युमिनस लेझर मशीन आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अशा आणखी मशीन्स पालिका रुग्णालयांत गरजेच्या आहेत असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. या अत्याधुनिक मशीनचा फायदा कर्करोग रुग्णांना होणार असून त्यांच्यावर उपचार करणे सुलभ होणार आहे, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
























































