
सामना प्रतिनिधी । मुंबई
आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या भेंडीबाजारातील पाकमोडियावरील अमिना (मसुला) बिल्डिंगचा अखेर लिलाव झाला. सैफी बुऱहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीएटी) दाऊदची चार मजली इमारत अवघ्या ३ कोटी ५१ लाखांत खरेदी केली. दाऊदच्या या इमारतीसाठी दोघा जणांनी बोली लावली त्यात दिल्लीच्या भूपेंद्र भारद्वाज यांचा समावेश होता.
चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या लिलावात जप्त करण्यात आलेल्या एकूण ९ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला त्यात दाऊदच्या इमारतीचा समावेश होता. तस्कर आणि परराष्ट्र ऍक्ट कायद्यानुसार केंद्रीय अर्थ खात्याने या मालमत्तांचा लिलाव केला. दिल्लीचे वकील भूपेंद्र भारद्वाज यांनीही दाऊदच्या या चार मजली इमारतीसाठी १ कोटी ९१ लाखांची बोली लावली होती. देशाच्या शत्रूची एकही निशाणी मागे राहता कामा नये या भावनेने भारद्वाज यांनी लिलावात भाग घेतला होता.
इमारत धोकादायक
दाऊदची ही इमारत मोडकळीला आली होती. यातील भाडेकरू आणि पादचाऱयांच्या दृष्टीनेही ती धोकादायक झाली होती. त्यातच सैफी बुऱहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टतर्फे (एसबीएटी) क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे आम्ही या लिलावात सहभागी झालो असे ‘एसबीएटी’च्या प्रवक्त्याने सांगितले.
आधीच्या मालमत्ता ‘एसबीएटी’कडेच
नोव्हेंबर २०१७ ला दाऊदच्या तीन मालमत्तांचा लिलाव झाला होता. त्यात एक रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस आणि एका घराचा समावेश होता. या तीनही मालमत्ता ११ कोटींना विकल्या गेल्या होत्या. त्या सैफी बुऱहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टनेच (एसबीएटी) खरेदी केल्या होत्या.



























































