
सामना प्रतिनिधी ।मुंबई
अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने तंत्रशिक्षण संचालकांकडे केली. या घोळास जबाबदार असलेल्या ‘फोरपिलर’ या सॉफ्टवेअर कंपनीवर कडक कारवाई करून या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत नाही ना याची खात्री करावी असे निवेदन तंत्रशिक्षण संचालकांना देण्यात आले. डिप्लोमा इंजिनीयरिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. त्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना एकच महाविद्यालय दोनदा, काहींना रात्री एक तर सकाळी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश तर काहींना महाविद्यालयच मिळाले नाही असा अनुभव आल्याने विद्यार्थी आणि पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या गोंधळाची चौकशी करावी असे निवेदन शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांना दिले.























































