
सामना ऑनलाईन । चेन्नई
केरळमधील कोट्टायम शहरात एका पूजाऱ्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा प्रसाद असे त्या पुजाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा हा वैकोम येथील धनवंतरी मंदिरात पूजारी होता.
अरियाकुन्नम येथे राहणारी पीडित मुलगी ही दहावीत शिकत असून कृष्णा प्रसादने फेसबुकवरून तिच्याशी मैत्री केली होती. त्यानंतर ते व्हॉट्सअॅपवरून देखील चॅट करायचे. पीडित मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर कृष्णाने तिला मंदिराजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर तिला फूस लावून तो स्वत:च्या खोलीवर घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. दरम्यान मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांना कृष्णा प्रसाद विषयी मााहिती मिळाले. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी कृष्णाला अटक केली व त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली.
कृष्णावर पोक्सो कायद्यांतर्गत अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कृष्णावर याआधीही अशाप्रकारचा एक गुन्हा पोनकुन्नम पोलीस ठाण्यात दाखल आहे.























































