
सामना प्रतिनिधी । नांदेड
मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी पाण्यात बुडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी शहरापासून जवळच असलेल्या विष्णूपुरी येथे घडली. जीवरक्षक दलाच्या सदस्याकडून उशिरापर्यंत शोध घेणे सुरु होते.
शहरातील आंबेडकरनगर येथील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कालिदास संजय गायकवाड (२०) हा आपल्या दोन मित्रांसह विष्णूपुरी परिसरातील काळेश्वर मंदिराजवळ पोहण्यासाठी गेला होता. परंतु पोहताना तो बुडाला. कालिदास गायकवाड पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली असून, उद्या पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती कळताच सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.























































