
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्य सरकारने गायीच्या दुधाला 25 रुपये प्रतिलिटर दर देण्याचे बंधनकारक केलं आहे. सहकारी आणि खासही दूध प्रकल्प चालकांनी दरवाढीचा बोजा स्वत: सहन करण्याऐवजी नेहमीप्रमाणे ग्राहकांवर ढकलायचं ठरवलं आहे.यामुळे मुंबई, ठाणे, पुणे या सारख्या शहरांमध्ये गाईच्या दुधाचे दर 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढणार आहेत. ही दरवाढ आज किंवा सोमवारपासूल लागू केली जाणार आहे.
दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी आणि दूध प्रकल्पांचे चालक तसेच शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. चर्चेअंती गायीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये दर द्यायचं निश्चित करण्यात आलं. हा दर देत असतानाच पिशवीबंद दूध विक्री करणाऱ्यांना कोणतेही अनुदान देण्यात आले नाही. ज्यामुळे त्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ,वारणा सारख्या प्रकल्पांनी 11 ऑगस्टपासूनच ही दरवाढ लागू केली आहे. ही दरवाढ करूनही आम्हाला तोटा होत असल्याचं काही प्रकल्प संचालकांनी सांगितलं आहे.























































