
>> नवनाथ दांडेकर
शालेय क्रिकेटपासूनच सतत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवण्याची जिगर या मुंबईकर क्रिकेटरमध्ये होती. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचा हा पठ्ठ्या फलंदाजीला मैदानात उतरला की प्रतिस्पर्धी गोलंदाजांपुढे मोठा पेच उभा राहायचा. त्याच्या जिगरबाज वृत्तीला अफलातून पैलू पाडून आचरेकर सरांनी मुंबईलाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक जिगरी क्रिकेटर मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द भले छोटी असेल पण तीही आपल्या झुंजार खेळाने संस्मरणीय बनविणाऱ्या या मुंबईकर क्रिकेटरने संधीची वाट न पाहता स्वतःच अनेक सुसंधी निर्माण केल्या. मुंबई संघातून राष्ट्रीय संघात प्रवेश मिळणार नाही हे कळताच त्याने गोवा, रेल्वे, बंगाल आणि राजस्थान असा संघप्रवास केला आणि राष्ट्रीय निवडसमितीला आपल्या टीम इंडियातील प्रवेशासाठी दखल घ्यायला लावली. कसोटी पदार्पणात शतक झळकावून त्याने आपले नाव जगातल्या महान क्रिकेटपटूंच्या पंक्तीत नेले. पदार्पणीय शतक झळकावले तेही बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यांच्याच भूमीत. क्रिकेटर ते प्रशिक्षक आणि प्रशिक्षक ते क्रिकेट प्रशासक असा प्रवास करताना सतत संघर्ष करणाऱ्या या कसोटीपटूचे नाव आहे प्रवीण कल्याण आमरे. सध्या मुंबईच्या प्रथितयश शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्षपद भूषवत असलेले आमरे १४ ऑगस्टला आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने योद्धा क्रिकेटर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रवीण आमरे यांच्या प्रेरणादायी कार्याचा हा धावता आढावा.
दादरच्या शारदाश्रम शाळेतून वयाच्या नवव्या वर्षांपासून क्रिकेटशी आपले नाते जोडणाऱ्या प्रवीण आमरे यांच्यातील गुण आणि जिगर रत्नपारखी क्रिकेटप्रशिक्षक म्हणून परिचित रमाकांत आचरेकर यांनी ओळखले.आचरेकरसरांच्या मार्गदर्शनाखाली एक शैलीदार फलंदाज म्हणून आमरे राष्टीय स्तरावर उदयास आले. १९८६-८७ च्या हंगामात त्यांनी मुंबईकडून रणजी पदार्पण साजरे केले आणि त्यानंतर धावांचा ओघ त्यांच्या बॅटमधून सतत दिसून आला. पण बीसीसीआयच्या कोटा सिस्टिममुळे मुंबईतून राष्टीय संघात प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशांवर सतत पाणी फेरले गेले.पण झुंझार राजपूत रक्त नसानसात असलेले आमरे निराश झाले नाहीत. त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये मुबई ,रेल्वे ,राजस्थान आणि बंगाल अशा संघांचे प्रतिनिधित्व करीत आपल्या बॅटचे पाणी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पाजले.देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८० टक्केच्या सरासरीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या आमरे यांनी १९९१ च्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वनडे क्रिकेटमध्ये ३७ लढती खेळून त्यांनी २ अर्धशतकांसह ५१३ धावांची बेगमी केली.नाबाद ८४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली.
कसोटी पदार्पणात विक्रमी कामगिरी
रणजी ,दुलीप आणि इराणी चषक स्पर्धा गाजवल्यानंतर आमरे यांची १९९२ -९३ च्या हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक क्रिकेट दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषी राजवट उलथून पडल्यानंतर या देशाच्या दौऱ्यावर जाणारा हिंदुस्थान हा जगातला पहिलाच क्रिकेट संघ होता. दुर्बनच्या पहिल्याच कसोटीत अॅलन डोनाल्ड, मॅकमिलन आणि प्रिंगल या आग्यावेताळ गोलंदाजांपुढे अन्य हिंदुस्थानी फलंदाज नांगी टाकत असतानाच प्रवीण आमरे संघासाठी खंबीरपणे लढले. उसळत्या खेळपट्टीवर त्यांनी ४ बाद ३८ या केविलवाण्या स्थितीतून टीम इंडियाला सावरले. त्यांनी १०३ धावांची पराक्रमी शतकी खेळी करीत पदार्पणात कसोटी शतक झळकावणाऱ्या महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा सन्मान मिळवला. पदार्पणात कसोटी शतक झळकावणारे नववे हिंदुस्थानी फलंदाज म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंद केली. १९९२ -९३ असे दोनच हंगाम टीम इंडियाकडून खेळणाऱ्या आमरे यांनी ११ कसोटीत ४२.५० च्या सरासरीने ४२५ धावा नोंदवल्या. त्यात १ विक्रमी शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता.
प्रथमश्रेणीत खोऱ्याने धावा
शैलीदार फलंदाजीसाठी परिचित प्रवीण आमरे यांनी रणजी, दुलीप आणि इराणी करंडक क्रिकेट लढतींत खोऱ्याने धावा जमवल्या. ८६ प्रथमश्रेणी लढती खेळत त्यांनी ४८.८६ च्या सरासरीने ५,८१५ धावांची नोंद केली. त्यात १७ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. इराणी करंडकात शेष हिंदुस्थानकडून खेळताना आमरे यांनी रणजी विजेत्या बंगालविरुद्ध फटकावलेली २४६ ही त्यांची प्रथमश्रेणीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे इराणी करंडकात आजतागायत त्यांची ही सर्वोच्च धावसंख्या देशातील कोणत्याही फलंदाजाला गाठता आलेली नाही.
यशस्वी क्रिकेट प्रशिक्षक
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अल्पावधीत भरपूर यश मिळवणाऱ्या आमरे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आपले ज्ञान युवा क्रिकेटपटूंना देऊन आपले गुरु आचरेकरसर यांना आगळी गुरुदक्षिणा देण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत मुंबईने अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत तीन वेळा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी व्यावसायिक बॅटिंग प्रशिक्षक म्हणून अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, नमन ओझा आणि रॉबिन उथप्पासारखे स्टार फलंदाज आपल्या कुशल मार्गदर्शनाने घडवले. आयपीएलमधेही एक वर्षे मुंबई इंडियन्स, तीन वर्षे पुणे वॉरियर्स या संघाना प्रशिक्षण दिले. सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला ते मार्गदर्शन करीत आहेत.
आदर्श क्रिकेट प्रशासक
क्रिकेट मैदानात योद्धा फलंदाज म्हणून ख्याती मिळवलेल्या परावी आमरे यांनी निवृत्तीनंतर आदर्श क्रिकेट प्रशासक म्हणूनही नाव मिळवले आहे . शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्षपद ते गेली ७ वर्षे यशस्वीपणे सांभाळत आहेत. शिवाजी जिमखान्याचे प्रशासन सांभाळताना हरमितसिंघ, सिद्धेश लाड, शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यरसारखे स्टार क्रिकेटर घडविण्यात आमरे यांचा सिहांचा वाट आहे.या कामात त्यांना मुंबईचे माजी स्टार फिरकीवीर पद्माकर शिवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मुंबई क्रिकेट अससोसिएशनच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सध्या एअर इंडियात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या आमरे यांनी क्रिकेटसाठी जेजे कार्य हाती घेतले ते मोठ्या निष्ठेने पार पडले आहे . क्रिकेटपटू ते क्रिकेटप्रशासक अशी शानदार वाटचाल करणारे प्रवीण आमरे १४ ऑगस्टला आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करीत आहेत. आपला रौप्यमहोत्सवी वाढदिवस साजरा करणाऱ्या आमरे यांना आपण सर्वानी लाख लाख शुभेच्छा देऊया !


























































