कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, तब्बल ९४ कोटी ४२ लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर मालवेअरवर अॅटॅक करून बँकेच्या व्हिसा आणि डेबिट कार्डधारकांची माहिती चोरून त्याद्वारे ८० कोटी ५० लाख रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. केवळ दोन तास १३ मिनिटांमध्ये हे पैसे २८ देशांमधून काढले गेले, तर स्विफ्ट ट्रान्झॅक्शनद्वारे १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँग येथील बँक खात्यावर वर्ग करून बँकेची एकूण ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कॉसमॉस बँकेने एटीएम, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल सेवा काही काळासाठी बंद केली असून, खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

कॉसमॉस बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे सायबर क्राईम सेल, रिझर्क्ह बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय पातळीकर व्हिसा व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली आहे. या सायबर हल्ल्याचा तपास करण्याचे काम आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीकडे सोपविण्यात आले आहे.

कॉसमॉस बँकेचे मुख्यालय गणेशखिंड रस्त्यावर आहे. तेथे बँकेचे डाटा सेंटर आहे. एटीएम स्वीचही आणि प्रशासकीय कामेही या ऑफिसमधून होत असतात. तसेच देशाबाहेरील कॉसमॉस बँकेच्या सर्व शाखांच्या व्यवहारावरही येथूनच नियंत्रण ठेवले जाते. शनिवारी (दि. ११) सायंकाळी व्हिसा कंपनीच्या अधिकाऱयांनी फोनद्वारे बँकेचे सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर सुरेशकुमार यांना फोन करून कॉसमॉस बँकेच्या व्हिसा डेबिट कार्डाचा वापर करून संशयास्पद व्यवहार होत असल्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आरती ढोले यांच्या सूचनेनुसार व्हिसाची एटीएम सर्व्हिस बंद करण्यात आली. त्यानंतर एका रुपे डेबिट कार्डधारकाने त्याच्या अकाऊंटमधील बॅलन्सबाबत तक्रार केल्याने ढोले यांनी रुपे डेबिट कार्ड सर्व्हिसही बंद केली. त्यांनी ही माहिती बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांना कळविली.

त्यानंतर व्हिसा आणि रुपे डेबिट कार्ड होणाऱया गैरव्यवहारांची पडताळणी केल्यानंतर व्हिसा कार्डद्वारे २८ देशांत तब्बल १२ हजार व्यवहार झाल्याचे आणि ७८ कोटी रुपये काढून घेतल्याचे आढळून आले आणि रुपे कार्डद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे व्यवहार देशात झाल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे १४ हजार ९४९ व्यवहारांचे ८० कोटी ५० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. बँकेचे रुपे आणि व्हिसा कार्ड इतर बँकांच्या एटीएममध्ये वापरण्यात आले. मालवेअरचा वापर करून ते अप्रुव्ह करण्यात आले. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी स्विफ्ट ऑनलाइन ट्रान्झॅक्शनद्वारे १३ कोटी ९२ लाख रुपयांचे तीन व्यवहार करून हाँगकाँग येथील हॅनसँग बँकेतील खात्यात वर्ग करण्यात आले आणि नंतर ते काढून घेण्यात आले.

summary : digital attack on cosmos bank