पालघरमध्ये 100 एकर जमिनीचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश चांदेकर । वाणगाव

ज्या पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वच्छ’ कारभाराची प्रवचने झोडली त्याच जिल्ह्यात 100 एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट ओळखपत्रे तसेच आधार कार्ड बनवून दलालांनी कोटय़वधी रुपयांची जमीन फक्त 23 लाख रुपयांना विकली. सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांना हाताशी धरून हे ‘सेटिंग’ केले असून मूळ जमीनमालकांना या व्यवहाराचा पत्ताच नव्हता. दुय्यम निबंधकांनी दलालांना नोटिसा बजावल्या असून या जमीन घोटाळ्यामुळे पालघर जिह्यात अक्षरश: भूकंप झाला आहे.

प्रमोद कर्णिक व कुटुंबीय यांची डहाणू तालुक्यातील बोंडगाव, नागझरी येथे वडिलोपार्जित 68 एकर जमीन आहे. कर्णिक हे व्यवसायानिमित्त मुंबईत राहतात. त्यांना जमिनीची देखभाल करणे जमत नव्हते. याचाच गैरफायदा घेऊन दलाल भोला ऊर्फ शीतल चोरडिया, नरेश पटेल व त्यांच्या साथीदारांनी मूळ मालकाची खोटी कागदपत्रे दुसऱयाच्या नावे केली. एकूण तीन खोटे दस्तावेज बनवून ही जमीन मुनावर खान, दिनेश जैन, अफरीम खान, वनिता जैन यांना परस्पर विकली. बाजारभावाप्रमाणे 68 एकर जमिनीची किंमत कोटय़वधी रुपये असताना फक्त 16 लाख 55 हजार रुपयांना त्याची विक्री करण्यात आली.

या दलालांचा डहाणू तालुक्यातील गंजाड, सोमनाथ, गणेशबाग येथील जमिनीवरही डोळा होता. या जमिनीचे मूळ मालक अमित पटेल, अंकित मेहता, नरेश दोशी, विमला मेहता हे आहेत. त्यांची एकूण 32 एकर जमीन असून बनावट ओळखपत्रे व अन्य बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन कीर्ती जैन, मुमताज खान यांना फक्त सहा लाखांना विकली. खोटे मालक उभे करून त्यांच्या नावे बनावट ओळखपत्रांच्या आधारे कोटक महिंद्र बँकेत खाते उघडण्यात आले. जमिनीच्या मूळ मालकांची खात्री न करता तसेच कोणतीही चौकशी न करता या जमिनी विकत तरी कशा घेतल्या गेल्या, असा सवाल विचारण्यात येत आहे.

दुय्यम निबंधकांनी दिली कबुली
100 एकर जमिनीचा हा कोटय़वधी रुपयांचा घोटाळा असून मूळ मालकांची फसवणूक करून व्यवहार करण्यात आला आहे. सरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱयांचीदेखील या घोटाळ्यात साथ लाभली असून डहाणूचे प्रभारी दुय्यम निबंधक जयशंकर शेवडे यांनी या घोटाळ्याची कबुली दिली आहे.

दस्तऐवजांची नोंदणी करताना घोटाळा उघडकीस
जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी करताना निवडणूक ओळखपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तहसीलदारांना या ओळखपत्रांची पडताळणी करावी असे पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच फसवणूक करणाऱया दलालांनादेखील नोटिसा बजावल्या आहेत. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.