हिंदुस्थानचा ‘अजित’ कर्णधार काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज रात्री प्रकृती ढासळल्याने त्यांना तातडीने जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

1 एप्रिल 1941 रोजी वाडेकर यांचा मुंबईत जन्म झाला. त्यांनी इंजिनीयर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. पण ते क्रिकेटपटू झाले. 1958 मध्ये मुंबईच्या संघातून अजित वाडेकर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एक आक्रमक फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख होती. ते एक यशस्वी कर्णधारही होते. हिंदुस्थानने वाडेकर यांच्या कर्णधारपदाखाली पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

सन्मान
अजित वाडेकर यांना ‘अर्जुन’ पुरस्काराने तसेच 1972 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचसह त्यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार, स्पोर्टस् पर्सन ऑफ दी इयर पुरस्कार आणि कॅस्ट्रोल जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

कसोटी कारकीर्द
सामने – 37
धावा – 2113
फलंदाजी सरासरी : -31.07
शतक – 1
अर्धशतके – 4
झेल- 46

वन डे कारकीर्द
सामने – 2
धावा – 73
फलंदाजी सरासरी – 36.50
अर्धशतक – 1
झेल – 1

अजित वाडेकर यांचा अल्पपरिचय
– अजित वाडेकर यांचा जन्म 1एप्रिल 1941 रोजी मुंबईत झाला. मुलाने शिक्षण घेऊन इंजिनीयर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण अजित वाडेकर यांनी क्रिकेट हेच करीयर निवडले.
– अजित वाडेकर हे 1958 साली पहिल्यांदाच प्रथमश्रेणी सामना खेळले. 1966 ते 1974 या दरम्यान त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले.
– अजित वाडेकर हे 1966 साली वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळले आणि 1974 साली इंग्लंडविरुद्ध पहिला वन डे सामना ते खेळले.
– अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज व इंग्लंडमध्ये हिंदुस्थानने कसोटी मालिका विजय संपादन केला. सलग तीन मालिका विजय मिळवणाऱया संघाचे ते पहिलेच हिंदुस्थानी कर्णधार ठरले.
– कसोटी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक/व्यवस्थापक आणि राष्ट्रीय निवड समितीचे चेअरमन अशा सर्व भूमिका पार पाडणारे ते हिंदुस्थानचे लाला अमरनाथ व चंदू बोर्ड यांच्यानंतरचे तिसरचे हिंदुस्थानी होते.
– कॉलेजला जाण्यासाठी अजित वाडेकर यांनी बस पकडली. माजी गोलंदाज बाळू गुप्तेही याच बसमध्ये होते. बाळू गुप्ते यांनी ‘‘आम्हाला मॅचसाठी बाराव्या खेळाडूची गरज आहे. तू येतोस का’’ म्हणून विचारले. वाडेकर यांनी त्यांना लगेच ‘‘हो’’ म्हटले. तिथून सुरू झाला प्रवास.

प्रतिक्रीया

हिंदुस्थानी क्रिकेट विश्वात अजित वाडेकर यांचे मोलाचे योगदान आहे. शैलीदार फलंदाज, तितकाच उत्कृष्ट कर्णधार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेट संघाने अविस्मरणीय विजय मिळवले. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वाचे मोठे नुकसान झाले.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अजित वाडेकर यांच्या जाण्याने धक्काच बसला. आम्ही एका महान क्रिकेटपटूला मुकलो आहोत. परदेशात हिंदुस्थानला जिंकून देणारे ते पहिले कर्णधार होते. अशा महान क्रिकेटपटूला भावपूर्ण श्रद्धांजली.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या विजयी सीमोल्लंघनाचे कर्ते अजित वाडेकर काळाच्या पडद्याआड गेले. जागतिक पातळीवर हिंदुस्थानच्या क्रीडा अस्तित्वाची यशस्वी मोहोर उमटवणारा क्रिकेट विश्वाचा उमदा तारा निखळला. त्यांचे कर्तृत्व अजरामर राहील.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदुस्थानला सलग तीन सिरीज जिंकून देणारे ते पहिले हिंदुस्थानी कर्णधार होते. तीनपैकी दोन सिरीज त्यांनी परदेशात तर एक मायदेशीच जिंकून दिली होती. भावपूर्ण श्रद्धांजली.
– बिशनसिंग बेदी, माजी क्रिकेटपटू