कॉसमॉस दरोडय़ामागे उत्तर कोरियाचा ‘लजारस’ हॅकिंग ग्रुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुण्याच्या कॉसमॉस बँकेवर टाकण्यात आलेल्या 94 कोटी 42 लाख रुपयांच्या दरोडय़ामागे उत्तर कोरियाचा कुख्यात ‘लजारस’ हॅकिंग ग्रुप असण्याची शक्यता सायबरतज्ञांनी व्यक्त केली आहे. एटीएम कॅश आऊटच्या माध्यमातून बँकेतून कोटय़वधी रुपये वळते करण्यात आले. या ग्रुपने जगभरात धुमाकूळ घातला असून याआधी सोनी पिक्चर्सचा डेटाही लीक करून नष्ट केला होता. पोलंड, बांगलादेशच्या बँकांच्या सर्व्हरवरही हल्ला करून कोटय़वधी रुपये उडवले होते.

कॉसमॉस बँकेवरील दरोडा मालवेअर किंवा विध्वंसक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टाकण्यात आल्याचे ‘एनपीसीआय’ अर्थात द नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडीया या संस्थेने म्हटले आहे. ‘एनपीसीआय’ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर सरकारी बँकांना विविध देयकांबाबतच्या व्यवहारात मदत करते. ‘एनपीसीआय’ची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित असल्याचा दावाही ‘एनपीसीआय’ने केला आहे. बँकेच्या आयटी प्रणालीत घुसून डेबिट आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून चोरटय़ांनी इतका मोठा दरोडा टाकल्याचे ‘एनपीसीआय’ने स्पष्ट केले आहे. चोरटय़ांनी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवरच मालवेअर सॉफ्टवेअरद्वारे हल्ला करून नव्वद कोटींहून अधिक रक्कम हजारो डेबिट कार्डांचे क्लोनिंग करून चोरल्याचा दावा कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केला.

n इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम या सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कारण बँक आपली संपूर्ण यंत्रणा अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत का?
कॉसमॉस बँकेतल्या खातेधारकांचे पैसे सुरक्षित असून भविष्यातही हा पैसा सुरक्षित राहील असा दावा बँकेने केला आहे. हॅकर्स ग्रुपने बनावट सर्व्हर किंवा प्रॉक्सी स्वीचचा वापर बँकेच्या मुख्य यंत्रणेमध्ये केला नव्हता. त्यामुळे पैसे सुरक्षित असल्याचे बँकेने म्हटले आहे.

हॅकिंग ग्रुपने काय केले?
बँकेच्या सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये घुसून हा सायबर हल्ला केला. हा फायरवॉलच एटीएम व्यवहार सुरळीतपणे पार पाडतो.
कॅनडा येथून या ग्रुपने 11 आणि 13 ऑगस्ट रोजी मालवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवला.
त्यानंतर एक बनावट सर्व्हर तयार करून त्याच्या माध्यमातून एटीएममधून व्यवहार करण्यात आला.
बनावट सर्व्हरमुळे क्लोनिंग केलेल्या डेबिट, व्हिसा कार्डची पडताळणी न करताच एटीएमला पैसे काढण्याबाबतचे निर्देश मिळाले.

‘एफबीआय’ने दिला होता इशारा
सायबर गुन्हेगार जागतिक बँकांवर एटीएम कॅश आऊटच्या माध्यमातून सायबर हल्ल्याची योजना बनवत असल्याची कल्पना अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘एफबीआय’’ने दिली होती. एटीएम कॅश आऊट घोटाळय़ात बँक किंवा डेबिट, व्हिसा कार्ड पेमेंट प्रोसेसरला लक्ष्य केले जाते. त्यानंतर काही तासांतच या कार्डांमधून कोटय़वधी रुपये काढले जातात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या इशाऱयाबाबत माहिती दिली होती, परंतु तोपर्यंत कॉसमॉस बँकेत घोटाळा झाला.