
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानचे महान क्रिकेटपटू माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित वाडेकर यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी क्रिकेटपटू, नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती. वरळी येथील निवासस्थानापासून शिवाजी पार्कपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. अजित वाडेकर यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. तेथे त्यांना पोलिसांकडून 21 बंदुकीच्या फैरींची सलामीही देण्यात आली.
अजित वाडेकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन वासू परांजपे, नरी कॉण्ट्रक्टर, पद्माकर शिवलकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, साबा करीम, समीर दिघे, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी, जतीन परांजपे या क्रिकेटपटूंसह शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे, कपिल पाटील, जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ हॉकीपटू एम. एम. सोमय्या, अभिनेते रमेश भाटकर, अतुल परचुरे आदी मान्यवरांनी घेतले आणि या दिग्गज क्रिकेटपटूला आदरांजली वाहिली. यावेळी सूर्यकांत लाडे यांच्या अपंग क्रिकेटपटूंच्या संघटनेकडून त्यांना विशेष सॅल्यूट करण्यात आला. अजित वाडेकर यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी जसलोक रुग्णालयात निधन झाले.
‘वाडेकर सर अमर रहे…’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा…’
अजित वाडेकर यांची अंत्ययात्रा वरळी येथील निवासस्थानापासून शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीपर्यंत आली. यादरम्यान त्यांच्या हजारो चाहत्यांनी ‘वाडेकर सर अमर रहे’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा वाडेकर सर आपका नाम रहेगा’ अशा घोषणा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वाडेकर सरांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला – सचिन तेंडुलकर
अजित वाडेकर सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा मला माझ्या क्रिकेट कारकीर्दीत मोठा फायदा झाला. खरेतर विसावे वर्ष हे कोणत्याही युवकासाठी महत्त्वाचे वर्ष असते. यादरम्यान तोल जाऊ शकतो, पण अजित वाडेकर यांच्यामुळे मी योग्य मार्गावर जाऊ शकलो, असे भावुक उद्गार ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने यावेळी काढले.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांची अनुपस्थिती
अजित वाडेकर यांनी हिंदुस्थानी क्रिकेटला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी देशाची अविरतपणे सेवा केली. हिंदुस्थानसाठी क्रिकेटपटू, कोच, व्यवस्थापक, निवड समिती सदस्य अशा वेगवेगळय़ा भूमिका चोखपणे बजावणाऱया अशा दिग्गज क्रिकेटपटूच्या अंतिम दर्शनाला मात्र बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांची अनुपस्थिती होती. जनरल मॅनेजर (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करीत अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
अजित वाडेकर यांचा शिवाजी पार्कशी जिव्हाळा होता. अतूट नाते होते. त्याचमुळे त्यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्क जिमखान्याच्या दारातून नेण्यात आली. यावेळी शिवाजी पार्क जिमखान्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


























































