बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, हॉकी, ऍथलेटिक्स, कबड्डी या खेळांमध्ये पदक मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडोनेशियात उद्यापासून सुरू होणाऱ्या आशियाई या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत पदकांवर मोहोर उमटवण्यासाठी हिंदुस्थानचा संघ रेडी झालाय. यावेळी बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, हॉकी, ऍथलेटिक्स, कबड्डी या खेळांमधून हिंदुस्थानला पदके मिळवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला हमखास पदक मिळणाऱ्या खेळाडूंवर टाकलेला हा प्रकाशझोत.

बॅडमिंटनमध्ये सुवर्णचा दुष्काळ संपवणार

बॅडमिंटन खेळामध्ये आतापर्यंत हिंदुस्थानला आठच पदके जिंकता आली आहेत. तसेच ही सर्व पदके कांस्य पदकेच आहेत. त्यामुळे यंदा सुवर्ण व रौप्य पदक जिंकण्याकडे हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंचा कल असेल यात वाद नाही. पुरुषांच्या गटात किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांच्यावर तर महिलांच्या गटात पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल या दोघींवर पदक जिंकण्याची मदार असेल.

ऑलिम्पियन चॅम्पियन गाजवणार कुस्ती

हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती या खेळात नऊ सुवर्ण पदकांसह एकूण 56 पदकांची कमाई केलीय. सुशील कुमार व साक्षी मलिक या ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची गॅरंटी आहे. या दोघांसह देशातील इतर कुस्तीपटू कशी कामगिरी करताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सुवर्ण पदकांची दमदार चढाई

कबड्डी या खेळामध्ये हिंदुस्थानला आशियाई क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करता आले आहे. या खेळातून हिंदुस्थानने तब्बल नऊ सुवर्ण पदके जिंकलीत. या खेळामध्ये हिंदुस्थानचा संघ रौप्य व कास्य पदकासह मायदेशात परतला, तर ते अपयश समजतात. यावरूनच या खेळातील गोल्ड मेडल पक्के आहे हे समजले असेलच.

आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धेचा धमाका

जकार्ता : इंडोनेशियात उद्यापासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जकार्ता व पालेमबांग या शहरांमध्ये ही प्रतिष्ठsची स्पर्धा रंगणार असून यामध्ये 45 देशांचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. तसेच यावेळी 40 खेळांच्या 465 स्पर्धांही होणार आहेत. 18 ऑगस्टपासून सुरु होणारी ही स्पर्धा दोन सप्टेंबरपर्यंत चालेल.