
सामना ऑनलाईन, मुंबई
भायखळा व सातरस्त्याच्या मध्यावरील ब्रिटिशकालीन बीआयटी चाळींचा पुढील काही वर्षांत चेहरामोहरा बदलून जाणार आहे. या चाळींच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू असून 180 चौरस फुटांच्या घरातील रहिवाशांना 405 चौरस फुटांची घरे मोफत मिळणार असून पुनर्विकासानंतर या चाळींतील रहिवाशांचे जीवनमानच बदलून जाणार आहे.
मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत बॉम्बे इप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) अनेक जुन्या चाळींत आहेत. ब्रिटिशकाळात बांधलेल्या या चाळी आता जीर्ण झालेल्या आहेत. कुटुंब वाढल्यामुळे चाळींतील रहिवाशांना सध्याची घरे अपुरी पडू लागली आहेत. जुन्या झालेल्या या चाळींतील अनेक घरांमध्ये छताचे प्लास्टर पडल्यामुळे रहिवासी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या चाळी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहेत, पण देखभालीअभावी पुनर्बांधणीशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. सातरस्त्याच्या बीआयटी चाळींनाही पुनर्विकासाशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे या चाळीत ब्ल्यू प्लॅनेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या रहिवाशांच्या संघटनेने पुढाकार घेऊन पुनर्विकासाचा पर्याय स्वीकारला. एका खासगी विकासकाच्या मदतीने या चाळींतील रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.
सात रस्ता येथील बीआयटी चाळींच्या या चार इमारतींमध्ये सुमारे 324 भाडेकरू आहेत. या चाळींत बौद्ध, रोहिदास, मेघवाल समाजाचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. या चाळींच्या आसपास नवीन टॉवर उभे राहिले, पण या जुन्या चाळींचा पुनर्विकास रखडला होता. पण आता या चाळी पाडून पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे.
या चाळींतील रहिवाशांना आता 405 चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. त्याशिवाय सरासरी पाच लाख रुपयांचा कॉर्पर्स फंड मिळेल. नवीन इमारत बांधून झाल्यावर या चाळींतील रहिवाशांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. आता लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन नवीन वास्तूत गृहप्रवेश करण्याचे आमचे स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करीत आहेत.
























































