ग्रीन रिफायनरी विरोधकांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना पळवून लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

‘एवढी माणसे कशाला? जठार यांच्या…’, ‘विरोध राहणार, विरोध राहणार….. रिफायनरीला विरोध राहणार’, ‘जमिन आमच्या हक्काची …..नाही कोणाच्या बापाची’ , ‘रिफायनरी हटाव ….. कोकण बचाव’, ‘प्रमोद जठार….. हाय हाय…’ अशा घोषणांनी ग्रीन रिफायनरी विरोधात गिर्ये रामेश्वर येथिल ग्रामस्थांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची गाडी अडवत काळे झेंडे दाखवून तीव्र विरोध व्यक्त केला. आंदोलकांच्या भावना तीव्र असल्यामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतल्यावर आंदोलकांनी एकच घोषणाबाजी करत प्रमोद जठार यांना माघारी पाठविले तसेच आंदोलनकर्तांनी तब्बल 1 तास रस्ता राखून ग्रीन रिफायनरीचा विरोध दर्शविला.

रामेश्वर येथे सर्व नागरिकांसमवेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करीत संघर्ष समितीचे अध्यक्ष व गिर्ये-रामेश्वर येथील सरपंच यांना नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात येवून नागरिकांशी चर्चा करू व हा प्रकल्प विनाशकारी आहे कि नाही याची खातरजमा झाल्यानंतर हा प्रकल्प जर नागरिकांना विनाशकारी असा वाटत असेल तर नागरिकांसमवेत आपण या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवू असे अभिवचन दिल्यानंतर गिर्ये-रामेश्वर येथील नागरिकांनी नाणार रिफायनरी विरोधात पुकारलेले आंदोलन तब्बल 1 तासानंतर थांबविण्यात आले. गेली 10 वर्षे विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम डेचे आयोजन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जात होते. या वर्षी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुखद निधनानिमित्त हेलियम डे जल्लोषात साजरा न करता विजयदुर्ग येथिल भाजपा कार्यालयात जावून श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हेलियम डेच्या निमित्ताने प्रमोद जठार विजयदुर्ग येथे येणार असतील तर त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवत तीव्र विरोध करण्याचा निर्णय येथिल स्थानिक ग्रामस्थ व संघर्षच्या वतीने घेण्यात आला होता व त्या अनुषंगाने प्रमोद जठार आपल्या कार्यकर्त्यांसमवेत विजयदुर्ग येथे जात असताना गिर्ये येथे प्रकल्पग्रस्तांनी प्रमोद जठार यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवले व निषेधाच्या घोषणा दिल्या.

आंदोलकांचे आक्रमक रूप लक्षात घेता पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्या मार्गावरून गाड्य़ा पुढे मार्गस्थ करण्यात आल्या परंतु रामेश्वर येथेही प्रकल्पग्रस्त नागरिक आक्रमक झाले असल्याने त्यांनी या सर्व गाड्य़ा पुन्हा अडविल्या. व त्या ठिकाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकूर, सर्जु घाटये, सरंपच विनोद सुके, या सर्वांनी प्रकल्पाविरोधी आपल्या भावना व्यक्त करीत प्रमोद जठारांचा विजयदुर्गकडे जाण्याचा रस्ता रोखून धरला. दरम्यान पोलीस प्रशासनामार्फत आंदोलनकर्त्यांना वारंवार मार्ग मोकळा करण्याकरीता प्रयत्न होत असताना आंदोलनकर्त्यांनी जठार यांना विजयदुर्गकडे जाण्यास कायमस्वरूपी मज्जाव केला व याच ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावा व तसेच माघारी जावे या भूमीकेवर आंदोलनकर्ते ठाम राहीले. अखेर प्रमोद जठार यांनी रिफायनरी प्रकल्पासदंर्भात स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात माजी आमदार अजित गोगटेंसमवेत उपस्थित राहून ग्रामस्थांची चर्चा करणार असल्याचे सांगितले. हा प्रकल्प जर नागरिकांना विनाशकारी वाटत असेल तर तो प्रकल्प रद्द करण्याकरीता स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून आंदोलन संपविण्यात आले.

या आंदोलनामुळे गिर्ये रामेश्वर परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपनिरिक्षक संतोष कोळी, गोविंद वारंग यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आला होता. दरम्यान आंदोलन कर्तांकडून तीव्र विरोधाची भावना लक्षात घेता पोलिसांनी वारंवार हस्तक्षेप करून कोणाताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन पार पडले.