
सामना ऑनलाईन | लंडन
इंग्लंड आणि हिंदुस्थानमध्ये नॉटिंगहॅमममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. दिनेश कार्तिकच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत हा हिंदुस्थानचा 291 वा कसोटीपटू आहे. या पदार्पणाच्या सामन्यात पंतने एक अशक्यप्राय विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट, सचिन, सेहवाग, ब्रॅडमन यांसारख्या दिग्गजांना जे जमले नाही ते पंतने करून दाखवले आहे.
पदार्पणातील कसोटीत षटकार ठोकून खाते उघडणाऱ्या खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये आता ऋषभ पंतचा समावेश झाला आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत पंतने रशीदच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला आणि अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या कसोटीत षटकार ठोकून खाते उघडणारा पंत बारावा खेळाडू असून अशी कामगिरी करणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू आहे.




























































