मित्राला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। आरवली

संगमेश्वर येथील कळंबूशी तालुक्यात डोहात पोहण्यासाठी गेलेल्या मित्राला वाचवताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माखजन परिसरात घडली आहे. सिद्धेश झगडे (21) असे मृत तरुणाचे नाव असून हृतिक चंद्रकांत झगडे असे त्याच्या मित्राचे नाव आहे. पट्टीचा पोहणाऱ्या सिद्धेशला सैन्यात जाण्याची इच्छा होती. गेल्याच महिन्यात त्याने सैन्यात जाण्यासाठी प्रवेश परीक्षाही दिली होती. पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सिद्धेशचे स्वप्न अपूर्णच राहीले. दरम्यान, सिद्धेशच्या निधनामुळे माखजन परिसरावर शोककळा पसरली आहे.

सिद्धेश व हृतिक एकाच कुटुंबातील आहेत. रविवारी ते दोघे व इतर दोन जण गुरे चारायला खाचार आगार येथील पाणलोट बंधाऱ्यावर गेले होते. दोन दिवसापासून कळंबूशी माखजन भागात जोरदार पाऊस पडत असल्याने गावनदीच्या पाण्याचा स्तरही वाढला होता. यामुळे हृतिकला पाण्यात पोहण्याचा मोह झाला. त्याने सिद्धेश व इतर दोघांनाही पोहण्यास जाण्याबदद्ल सांगितले. पण त्यांनी नकार दिला. यामुळे हृतिकने तो एकटाच पोहायला जात असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर बंधाऱ्याजवळील डोहात त्याने उडी मारली. पण डोहाच्या खोलीचा अंदाज नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे बघताच हृतिकला वाचवण्यासाठी सिद्धेशने पाण्यात उडी मारली. सिद्धेश पट्टीचा पोहणारा होता. त्याने कसेबसे हृतिकला वाचवले पण पाण्याचा स्तर वाढल्याने व डोह खोल असल्याने सिद्धेश मात्र पाण्यात बुडाला. सिद्धेश बुडाल्याचे बघताच मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली व झालेली घ़टनेबद्दल सिद्धेशच्या कुटुंबीयांना सांगितले. काही क्षणातच ही बातमी गावात वनव्याच्या आगीसारखी पसरली. गावकऱ्यांनी तसेच परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व शोध कार्य सुरू केले. परिसरात असणाऱ्या पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. गावकऱ्यांनी घटनास्थळ ते गावनदी ज्या गडनदीला मिळते ते सर्व परिसर पिंजून काढले. सांयकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते पण सिद्धेशचा मृतदेह अजून सापडला नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, माखजन पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र जाधव, संदीप माणके, मुरुडकर, तुकाराम कुंभार आदी सहकारी घटनास्थळी पोहचले असून शोधकार्य सुरू आहे.

summary…while saving friend young boy drawn in sangmeshwar