
सामना ऑनलाईन । परळी
अंबाजोगाई – अहमदपूर मार्गावर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री सापळा लावून अटक केली. नऊ दरोडेखोरांपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली असून इतर पाचजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. अटक केलेल्या चौघांकडून जीपसह शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गोविंद सौदागर गीते, संभाजी लिंबाजी कांबळे, दत्ता मोहन गीते, शंकर नरसिंह गायकवाड अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे चौघेही एका जीपमधून परळीकडे आले. त्यानंतर ते अंबाजोगाई – अहमदपूर मार्गावरील परळीपासून २० किलोमीटरील ढाब्यावर थांबले. काहीजण जीपमध्ये बसले होते, तर काही जण बाजूलाच दरोडा टाकण्याचा योजना आखत होते. हा प्रकार अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांना समजला. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना माहिती दिली.
चाटे यांनी ढाब्याच्या बाजूने सापळा लावला. योग्य वेळी त्यांनी दरोडेखोरांवर झडप घातली. परंतु बाहेर उभ्या असलेल्या एका दरोडेखोराचे पोलिसांकडे लक्ष गेले. अंधाराचा फायदा घेत त्यांनी धूम ठोकली. जीपमधील चौघे मात्र पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर रात्रभर पोलिसांनी शोध मोहीम राबविली. परंतु इतर पाच जण हाती लागले नाहीत. जीपची झडती घेतली असता दोन कुऱ्हाडी, हॉकी स्टिक, सत्तूर, खंजीर, चटणी, दोरी, टांबी, काठ्या असे साहित्य आढळून आले. हे जप्त करुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चाटे यांच्या फिर्यादीवरुन नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.






























































