
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
परीक्षाकेंद्रात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात सीबीएसई बोर्डाने कडक पावले उचलली आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेपासून परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेशबंदी केली जाणार आहे. उशिरा येण्यामागचे कोणतेही कारण विद्यार्थ्यांकडून ऐकून घेतले जाणार नसून 10 वाजून 15 मिनिटांपर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार आहे.
परीक्षेतील कॉपीचे प्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कॅट, जेईई आणि नीट परीक्षेसाठी ठरावीक वेळे निश्चित केला आहे. यावेळेतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जातो. त्याच धर्तीवर हा नियम तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईचा दहावी, बारावीचा पेपर फुटला होता. त्यामुळे यापुढे परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना वेळेच बंधन घालण्यात आले आहे.
अशी असेल परीक्षेची वेळ
> परीक्षा केंद्र 9.30 वाजता खुले होईल. त्यानंतर 10.15 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते.
> 15 मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचनासाठी दिला जातो. ज्यानंतर साडेदहा वाजता प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होते.
> गेल्या वर्षी परीक्षा केंद्रात उशिरा येण्याची मुदत 11 पर्यंत होती. आणि इमरजन्सी एण्ट्री 11.15 पर्यंत होती.























































