
सामना ऑनलाईन । मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशींना घटनेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला बीसीसीआयकडून विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर चेन्नईत मंगळवारी नव्या घटनेची नोंदणी करण्यात आली. आता यापुढे बीसीसीआयचा कारभार या नव्या घटनेनुसार चालणार असून निवडणूक प्रक्रियाही लवकरच पार पडणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींच्या समावेशामुळे बीसीसीआयच्या कार्यकारिणीत कायापालट होईल तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची रेंगाळलेली निवडणूकही येत्या 30 दिवसांमध्ये होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवाय यापुढे संलग्न संघटनांनाही नव्या घटनेनुसार कामकाज करावे लागणार आहे.
नव्या चेहऱयांना संधी
लोढा समितीच्या शिफारशींनुसार आता दोन टर्म पदावर राहिलेल्या पदाधिकाऱयांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. तसेच 70 वर्षांवरील पदाधिकाऱयांना संघटनेत स्थान असणार नाही. त्यामुळे आता बीसीसीआयच नव्हे तर संलग्न संघटनांमध्ये नव्या चेहऱयांना संधी मिळेल हे निश्चित आहे.
एमसीएतही होणार मोठे फेरबदल
बीसीसीआयने नव्या घटनेची नोंदणी केल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) रेंगाळलेली निवडणूकही येत्या 30 ते 40 दिवसांच्या आता पार पडेल हे निश्चित झाले आहे. नव्या शिफारशींच्या समावेशामुळे आता एमसीएच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल होतील. कारण यामधील बहुतांशी पदाधिकाऱयांनी दोन टर्म किंवा त्यापेक्षा जास्त काळ पदभार सांभाळला आहे. उन्मेष खानविलकर हे फक्त गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यांना पुन्हा संधी मिळू शकते.




























































