
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देणाऱया निवडणूक आयोगाची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल केली. राज्यसभा निवडणुकीत ‘वरीलपैकी कोणीही नाही’ अर्थात ‘नोटा’ या पर्यायाला परवानगी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावले.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना आज रद्दबातल ठरविली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय देणाऱया निवडणूक आयोगाला चांगलाच झटका बसला आहे.
जनतेतून निवडल्या जाणाऱया लोकसभा आणि विधानसभा सदस्यांच्या निवडणुकीत मतदाराला ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध केला आहे, असे स्पष्ट करीत खडंपीठाने निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेबाबत सवाल उपस्थित केले. गुजरात विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद शैलेश मनुभाई परमार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेला याचिकेद्वारे आव्हान दिले होते. गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने अहमद पटेल यांना उमेदवारी दिली होती.
‘नोटा’ने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल – याचिकाकर्ते
‘नोटा’ उपलब्ध करून निवडणुकीत मतदान न करण्याला निवडणूक आयोगाने कायदेशीर मान्यता दिली होती, असे यापूर्वी खंडपीठाने म्हटले होते. ‘नोटा’ पर्याय जर राज्यसभा निवडणुकीत वापरण्यास परवानगी दिली तर भ्रष्टाचार आणि मतखरेदीला प्रोत्साहन मिळेल, असा दावा शैलेश परमार यांनी आपल्या याचिकेत केला होता.


























































