
सामना ऑनलाईन, देवगड
जम्मू कश्मीर येथे देशाच्या संरक्षणार्थ शहीद झालेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील वैभववाडीचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे आज वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, मालवण तालुक्यातील ग्रामस्थांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्र किनारी देवगडवासीयांच्या वतीने अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी तमाम जनतेला अश्रू अनावर झाले. वंदे मातरम, अमर रहे अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहे, भारत माता की जय, जब तक सुरज चाँद रहेगा वीर जवान तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी कुणकेश्वर परिसर दुमदुमून गेला.
या वेळी माजी आमदार अजित गोगटे, अतुल रावराणे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, देवगड नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, तहसीलदार वनिता पाटील, स्वाभिमानचे सरचिटणी सबाळ खडपे, गणपत गावकर, कुणकेश्वर उपसरपंच रामानंद वाळके, एकनाथ तेली, विश्वास भुजबळ, सुगंधा साटम, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, नागेश आचरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, शाखाप्रमुख नीलेश सावंत, पंचायत समिती सदस्य निकिता कदम उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करत कौस्तुभ राणे यांना मानवंदना दिली.





























































