
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातील ई-कॉमर्स कंपन्यांपुढे विचित्र पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पाच कोटी लोक ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून नियमितपणे शॉपिंग करीत आहेत. मात्र तेवढय़ाच लोकांनी वर्षभरात ई-शॉपिंगला रामराम केल्याचे दिसत आहे. एकदा ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर हे लोक पुन्हा ई-शॉपिंगकडे वळलेले नाहीत. या ऑनलाइन ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे कसे वळवायचे, अशी चिंता कंपन्यांना सतावत आहे.
गुगलची कन्स्लटंट बेन ऍण्ड कंपनी आणि फिलँथ्रॉपिक व्हेंचर फंड ओमिडय़ार नेटवर्क्सने गेले नऊ महिने अभ्यास करून हे ट्विस्ट मांडले आहे. त्यांच्या अभ्यासावरून असे दिसतेय की गेल्या वर्षी पहिल्या शॉपिंगनंतर 5 कोटी 40 लाख युजर्सनी ऑनलाइन शॉपिंग बंद केले आहे. यामध्ये बहुतांश कमी उत्पन्न गटातील आणि इंग्रजीपेक्षा प्रादेशिक भाषांशी जवळीक असणारे युजर्स आहेत. नियमित ऑनलाइन शॉपिंग करणारे आणि ई-शॉपिंगकडे पाठ फिरवणारे यांचे गुणोत्तर 11:1 आहे.
5 कोटी युजर्सपैकी 50 टक्के युजर्सना पुन्हा ई-शॉपिंगकडे वळवले तर या क्षेत्रासाठी 50 अब्ज डॉलर्सच्या उद्योगाची संधी निर्माण होईल, असे गुगल इंडियाचे विक्री विभागाचे प्रादेशिक संचालक विकास अग्निहोत्री यांनी सांगितले. ओमिडय़ार नेटवर्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रूपा कुदवा म्हणाल्या, युजर्सना पुन्हा ई-शॉपिंगकडे वळवणे हे आव्हान आहे. युजर्सची भाषेशी संबंधित अडचण आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्स इंग्रजीत असतात. त्यामुळे युजर्सना त्या आपल्याशा वाटत नाहीत.
– एकदाच ऑनलाइन शॉपिंग करून नंतर ई-शॉपिंग बंद करणाऱ्या लोकांचे प्रमाण हिंदुस्थानात जास्त आहे.
– ई-शॉपिंगच्या वेबसाइट्स इंग्रजी भाषेत असल्यामुळे युजर्सची अडचण होते.
– ऑनलाइन शॉपिंगवर विश्वास ठेवण्याची ग्राहकांची मानसिकता नसल्याचे दिसून येते.
– अनेक ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार केलेला नाही. अनेक इंटरनेट युजर्सना शॉपिंग कार्टसारखे आयकॉनही माहीत नाही.



























































