‘एमआयएम’चा मुजोर नगरसेवक मतीनला ‘एमपीडीए’, 1 वर्षासाठी हर्सूल कारागृहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
syed-matin-mim

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरात जमाव जमवून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा तसेच मनपा सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा ‘एमआयएम’चा मुजोर नगरसेवक सय्यद मतीनवर पोलीस प्रशासनाने ‘एमपीडीए’खाली कारवाई करून त्याची एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टाऊन हॉल येथील सय्यद मतीन सय्यद रशीद (३८) हा मनपा निवडणुकीत वॉर्ड क्र. २०, जयभीमनगर येथून ‘एमआयएम’च्या तिकिटावर निवडून आला आहे. नगरसेवक झाल्यानंतर मतीनने सभागृहात पाण्यावरून राडा केला. तसेच ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास विरोध केला. या दोन्ही घटनांमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. तसेच मोतीकारंजा येथील दंगलीतही मतीनचा हात असल्याचे उघड झाले होते. मुस्लिम तरुणांना नाहक अटक करीत असल्याचा आव आणत ‘एमआयएम’ने सिटी चौक पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यावेळी मतीन याने पोलिसांवर अश्लील शिव्यांची लाखोली वाहत अंगावर चिल्लर पैसे फेकून चिथावणीखोर भाषण दिले होते. शहरात त्याच्या विघातक कारवाया वाढत असल्याने त्यास पोलीस प्रशासनाने तडीपार करण्याची कार्यवाही सुरू केली होती. ही कारवाई सुरू असतानाच मतीनने सभागृहात गोंधळ करून तर त्याच्या समर्थकांनी मनपासमोरील वाहनांची तोडफोड केली होती.

सय्यद मतीनविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, जाळपोळ करून नुकसान पोहोचवणे, धाक दाखवणे, सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान करणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे सिटी चौक, जिन्सी आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यांत दाखल असल्याने त्यास एक वर्षासाठी ‘एमपीडीए’खाली स्थानबद्ध करण्याचे आदेश आज मंगळवारी आयुक्तांनी काढले. विशेष म्हणजे मनपा सभागृहात वारंवार राडा करीत असल्याने नाकीनऊ आलेल्या मनपा प्रशासनाने त्याचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे दोन वेळेस प्रस्ताव पाठवलेला आहे.