
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा एमआयएमचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशीची पोलीस कोठडी संपल्यामुळे मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय. एच. मोहंमद यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून कुरेशीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रस्ताव मांडण्यात आला असता त्या प्रस्तावास विरोध करणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यास नगरसेवकांनी सभागृहात बेदम मारहाण केली होती. यामध्ये मतीन जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मतीन मारहाणीमध्ये जखमी होऊन त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजल्यामुळे जावेद कुरेशीने घाटीत धाव घेतली. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुकी केली. सातदिवे यांच्या तक्रारीवरून जावेद कुरेशीसह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जावेद कुरेशीला अटक केली. त्याची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांच्या समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.



























































