दरड कोसळली; माळशेज घाट दोन दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । मुरबाड

कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाटात मध्यरात्री अडीचच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाटातील रस्त्यावर दगड, माती पडल्याने संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. दिवसभर पडणारा मुसळधार पाऊस, दाट धुके आणि आजूबाजूला असणाऱ्या भुसभुशीत टेकड्या यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. दोन दिवस घाट बंद ठेवण्यात येणार असून येथील वाहतूक कर्जत-चाकण मार्गे वळवण्यात आली आहे. या दरडीखाली एका टेम्पोचा चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात माळशेज घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठे असते. नगरला जाण्यासाठी हा शॉर्टकट असल्याने अनेकजण घाटातून जाणे पसंत करतात. मंगळवारी पहाटे अचानकपणे मुसळधार पावसात छत्री पॉइंट येथे दरड कोसळली. तत्काळ वाहतूक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना समजताच कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन जेसीबींच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला करण्याचे काम दिवसभर सुरू होते. मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि दाट धुके यामुळे कामात अडथळे निर्माण होत होते.

धुके आणि पावसामुळे संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. बुधवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा दरडी हटवण्याचे काम हाती घेण्यात आले, मात्र घाटातील वाहतूक नेमकी केव्हा सुरू होईल हे सांगता येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली. माळशेज घाटात अनेक छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा असून त्याची माती व दगड दिवसभर रस्त्यावर कोसळत होते. वाहतूक पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. वाहतूक अन्यत्र वळवल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत आहे.

एसटी गेली आणि…
माळशेज घाटातल्या छत्री पॉइंटजवळ भलीमोठी दरड कोसळताच त्याचा काही भाग टेम्पोवर कोसळला. काही क्षणातच हा टेम्पो ढिगाऱ्याखाली चेपला गेला. चालक अमोल दहिफळे हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, दरड कोसळण्यापूर्वी काही मिनिटेच आधी एक एसटी बस घाटातून पुढे गेली होती. बस जाताच मागे दरड कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून एसटीतील प्रवासी बचावले. अन्यथा आंबेनळी घाटासारखी मोठी दुर्घटना घडली असती.