मालवणात वैद्यकीय अधिकाऱ्यांना रस्त्यात मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना दोन अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार दुपारी घडली. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी दुपारी डॉ. पाटील हे बाजार पेठेतून ग्रामीण रुग्णालय येथे येत असताना हॉटेल रुचिरा येथे दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी आडवी उभी करत त्यांना अडविले आणि कानशिलात मारले तसेच मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार डॉ. पाटील यांनी रात्री येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, नीलेश सोनावणे करत आहेत.

यापूर्वीही मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर मारहाण झालेले डॉक्टर रुग्णालयातील सेवा सोडून गेले. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. सद्य स्थितीत डॉक्टर पाटील हे एकमेव वैद्यकीय अधिकारी मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत आहेत. अशा स्थितीत त्यांना भर रस्त्यात मारहाण झाल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.