
सामना ऑनलाईन, श्रीनगर
बकरी ईदच्या नमाजानंतर कश्मीर खोऱ्यात माथेफिरू, फुटीरतावाद्यांनी हिंसाचार भडकविला. देशविरोधी नारेबाजी करीत पाकिस्तान आणि ‘इसिस’चे झेंडे फडकविले. श्रीनगरसह अनेक शहरांत लष्करी जवान आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे कश्मीर खोऱ्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले.
रमजान ईदप्रमाणे बकरी ईदच्या दिवशी मोठा हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने कश्मीर खोऱ्यात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र श्रीनगर येथील इदगाह मैदानावर हुरियतचा फुटीरतावादी नेता मीरवाईज उमर फारुखचे भडकावू भाषण झाले. नमाजानंतर मोठा जमाव दगडफेक करीत रस्त्यावर उतरला. पोलीस आणि लष्करी जवानांवर दगडफेक सुरू केली. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. श्रीनगरच्या मुख्य चौकात माथेफिरू, देशद्रोही तरुणांनी पाकिस्तान आणि ‘इसिस’चे झेंडे फडकवीत दगडफेक केली. सोपोर, बारामुल्ला, कुपवाडा येथेही हिंसाचार भडकला असून कश्मीर खोऱ्यात प्रचंड तणाव वाढला आहे.
‘भारत माता की जय’चे नारे दिले म्हणून फारुख अब्दुल्ला यांना धक्काबुक्की
ईदचा नमाज अदा करण्यासाठी हजरत बल मशीद येथे गेलेले माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांना फुटीरतावाद्यांनी विरोध करीत धक्काबुक्की केली. त्यांना मशिदीबाहेर जाण्यास सांगितले. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत डॉ. अब्दुल्ला यांनी जोशपूर्ण भाषण केले. अब्दुल्ला यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ च्या घोषणा दिल्या होत्या. याचाच राग मनात धरून डॉ. अब्दुल्ला यांना आज श्रीनगरात धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर बोलताना अब्दुल्ला म्हणाले, काही माथेफिरू लोकांना वाटते मी घाबरून जाईन, पण असे होणार नाही. ‘भारत माता की जय’चा नारा देण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. मी नारा देणारच. हा देश सर्वांचा आहे.
नमाजावरून परतणाऱ्या पोलिसाची हत्या
कुलगाम येथे मशिदीबाहेरील चकमकीत पोलिसांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचवेळी नमाज अदा करून घरी परतणारे पोलीस कॉन्स्टेबल फय्याज अहमद शाह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यांच्यावर घराजवळच गोळ्या झाडल्या. फय्याज शाह हे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात होते. ईदसाठी ते घरी आले होते. दुसरी घटना पुलवामा येथे घडली. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद याकूब शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यात याकूब शाह शहीद झाले. तर कुपवाडा येथे भाजपचे कार्यकर्ते शब्बीर अहमद भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली.






















































