
सामना ऑनलाईन, नॉटींगहॅम
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने बुधवारी यजमान इंग्लंडचा 203 धावांनी धुव्वा उडवत नॉटिंगहॅम कसोटी खिशात टाकली आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. 2007 सालानंतर तब्बल अकरा वर्षांनंतर हिंदुस्थानने येथे विजय मिळवला. इंग्लंडचा संघ या कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. या कसोटीतील दोन्ही डावांत दमदार फलंदाजी करणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. हा विजय केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित करण्यात आला.
विराटने गांगुलीला टाकले मागे
नॉटिंगहॅम येथील तिसऱया कसोटी विजयाचा हीरो ठरलेल्या विराट कोहली या टीम इंडियाच्या कर्णधाराच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. हिंदुस्थानसाठी सर्वाधिक कसोटी विजय संपादन करणाऱया कर्णधारांच्या यादीत त्याने 22 विजयांसह दुसऱया स्थानावर झेप घेतली असून सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात मिळवलेल्या 21 कसोटी विजयांना मागे टाकले आहे. हिंदुस्थानने कसोटीत सर्वाधिक विजय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 27 कसोटी विजय मिळवले आहेत.






























































