बनावट ई-मेल बनवून कंपनीला दीड कोटीचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विल्को कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहणार्‍या कर्मचार्‍याचा ई-मेल आयडी दुसर्‍या पद्धतीने बनावट बनवून अज्ञात भामट्याने कंपनीच्या क्लायंटशी संपर्क साधला. मग आपणच कंपनीचे अधिकृत कर्मचारी असल्याचे भासवून त्या क्लायंटकडून 1 कोटी 70 लाख घेतले. असे करून त्या भामट्याने कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेपीयनसी रोड येथे राहणारे अजय शहा यांच्या विल्को कंपनीचे कुलाबा येथे ऑफिस आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहण्याचे काम एका कर्मचार्‍यावर सोपविण्यात आले होते. तो कर्मचारी एका ई-मेल आयडीवरून त्यांच्या क्लायंटशी संपर्क साधून व्यवहार करतो. अज्ञात आरोपीने कर्मचार्‍याचा तो ई-मेल आयडी चोरला. मग त्यासारखाच पण थोडा फेरफार करून दुसरा बनावट ई-मेल आयडी बनवला. त्यानंतर या बनावट ई-मेल आयडीच्या जोरावर आरोपीने शहा यांच्या क्लायंटशी संपर्क साधला आणि त्यांना परदेशातील विविध बँक खात्यात 1 कोटी 70 लाखाची रोकड जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे चोरट्याने शहांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली.

घर बांधून न देता वृद्धाचे 15 लाख लाटले

घर  बांधून देतो असा करार करूनही एका भामट्याने बोरिवलीत राहणार्‍या वृद्धाचे 15 लाख रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रमेश कदम (68) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोराईच्या संकल्प सिद्धी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणी घर बांधून देतो असा करार आरोपी रमेश कदम यांच्याशी करून 8 लाख 97 हजार घेतले. त्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे घर बांधून न देता आरोपीने करारनामा रद्द केला आणि घेतलेले पैसे व्याजासह परत करतो असा शब्द दिला. त्याप्रमाणे आरोपीने कदम यांना 15 लाखांचा धनादेश दिला, पण तो धनादेश न वटल्याने त्याने कदम यांची फसवणूक केली.