
सामना ऑनलाईन, पुणे
लंडनमध्ये स्थायिक झालेल्या धनाढ्य कुटुंबियांचा ६ कोटी किंमत असलेला स्वत:चा बंगला विकण्यात भयंकर अडचणी यायला लागल्या आहेत. या अडचणी या बंगल्यात त्यांनी ठेवलेल्या केअरटेकरमुळे आल्याने या कुटुंबियांना धक्का बसला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून या प्रकरणी न्यायालयाने एक बंगला मालकांना दिलासा देणारा आदेश दिला आहे.
अशोक आणि रेवती कपूर या दांपत्याने १९८३ साली बावधन भागात दीड एकर जागा विकत घेतली होती. या जागेवर त्यांनी देखणा बंगला बांधला होता. बंगल्याच्या देखभालीसाठी रामदास साष्टे यांनी त्यांनी नेमणूक केली होती. लंडनहून सातत्याने पुण्याला येणं शक्य होत नसल्याने कपूर दांपत्याने २०१६ साली हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला. एका व्यक्तीने हा बंगला ६ कोटींना विकत घेण्याची तयार दर्शवली. विक्रीच्या आधी कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून कपूर दांपत्याने या बंगल्याच्या विक्रीसाठीची नोटीस दिली होती. या विक्रीला विरोध करणारे एक पत्र कपूर दांपत्याला मिळाले. हे पत्र साष्टे यांचंच असल्याने कपूर दांपत्याला धक्का बसला होता.
आपल्या मालकीच्या बंगल्याच्या विक्रीला केअरटेकर विरोध करत असल्याचं पाहून कपूर दांपत्य धावत-पळत पुण्याला आलं. यावेळी साष्टे यांनी आपल्याला बंगल्यात येण्यास देखील मनाई केल्याचं दांपत्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान साष्टे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की साष्टे हे निव्वळ केअरटेकर नसून ते तिथले भाडेकरू आहेत. तर कपूर दांपत्याने बंगल्याच्या बाहेर बांधलेली खोली ही साष्टे यांना भाड्याने दिली असून साष्टे त्यासाठी हे कपूर दांपत्याला दर महिना १ हजार रूपये देत असल्याचं साष्टेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. या बंगल्याच्या आवारातील खोलीचा पत्ता देऊन साष्टे यांनी आधार कार्डासारखी सरकारी कागदपत्रेही मिळवली आहेत. साष्टेंच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की बंगल्याच्या देखभालीसाठी त्यांनी वेळोवेळी खर्च केला आहे.
कपूर आणि साष्टे यांच्या वकिलांनी केलेले युक्तिवाद ऐकल्यानंतर मार्च २०१७ साली न्यायालयाने कपूर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. केअरटेकर किंवा नोकर हा मालकाच्या गैरहजेरीत देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आलेला असतो, तो कितीही वर्ष तिथे राहीला तरी तो मालक होऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने कपूर यांना बंगल्यामध्ये जाण्यास साष्टे रोखू शकत नाही असंही स्पष्ट केलं होतं. साष्टे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं, तिथेही न्यायालयाने नुकताच कपूर यांच्याच बाजूने निर्णय दिला. मात्र कपूर यांना विनाअडथळा बंगल्याची विक्री करण्यासाठी यापुढेही न्यायालयीन लढाई लढावी लागण्याची शक्यता आहे.






























































