
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात येणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ही शक्यता धुडकावून लावली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि 11 राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात येणार नाही असे रावत म्हणाले. संभाजीनगरमध्ये निवडक संपादकांशी संवाध साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, ‘देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय कायदेमंडळ घेऊ शकते. यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे. या प्रक्रियेला किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच आगामी 2019 मध्ये होणारी लोकसभा आणि 11 राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची कुठलीही शक्यता नाही.’
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी जेव्हा राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तेव्हा या बाबी कळण्यास व तयारी करण्यास पुरेसा वेळही निवडणूक विभागाला मिळू शकणार आहे. या परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.


























































