मोरुच्या मावशीने आज रडविले, अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
विजय चव्हाण

सामना ऑनलाईन, मुंबई

मोरुची मावशी या नाटकामध्ये केलेल्या भुमिकेमुळे गाजलेले अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्यावर फोर्टीस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.विजय चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

moruchi-mavshi-new

मधल्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. पुन्हा एकदा त्यांना अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.विजय चव्हाण यांनी जवळपास  ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. १९८५ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले होते. एप्रिल महिन्यात विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा हा पुरस्कार आपण आपल्या वडिलांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

विजय चव्हाणांसारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही अशा शब्दात विजय पटवर्धन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रतिक्रिया देताना पटवर्धन यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्यांनी रडत रडतच आपली भावना व्यक्त केली.

माझा एक चांगला मित्र आणि हरहुन्नरी नट हरपला अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी दिली आहे. आम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र कामं केली, आणि त्याने प्रत्येकवेळी स्वत:ची छाप निर्माण केली असंही ते म्हणाले. चव्हाण यांनी विनोदाची स्वत:ची एक शैली निर्माण केली होती, ज्याद्वारे त्यांनी स्व:तची ओळख निर्माण केली असं त्यांनी सांगितलं.

अत्यंत पॉझिटीव्ह मनोवृत्तीचा हा कलाकार होता, ज्याने मला निराश क्षणांमध्ये दिलासा दिला अशी प्रतिक्रिया अभिनेते जयवंत वाडकर यांनी दिली आहे.

चिरतरुण मावशीला मानाचा मुजरा!