भाजी चिरण्याच्या क्षुल्लक करणावरून मित्राला भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजी चिरण्याच्या क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचं पर्यवसान भोसकण्यात झालं आहे. या वादात एकाने आपल्याच मित्रावर वार केले आहेत. ही घटना चेंबुरमधील माहुल येथे असलेल्या म्हाडा कॉलनीत घडली. या प्रकरणी आरोपी विनोद तिवारी याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीत नऊ मित्र रुम शेयरिंगमध्ये राहत होते. आरोपी विनोदचे वडील राम यांनी ही खोली त्यांना भाड्याने दिली होती. विनोद सोडून बाकीचे एका कंत्राटदाराकडे रंगारी म्हणून काम करत होते. या नऊ मित्रांपैकी यातील एक मुंबईकर तर बाकीचे सितापूर, लखनौ येथून नोकरीच्या शोधात आले होते. घटनेच्या दिवशी शेअरिंगमध्ये राहणाऱ्या विनोद आणि त्याच्या मित्रांमध्ये भाजी चिरण्याच्या कारणावरून भांडण झालं.

हे भांडण इतकं विकोपाला गेलं की विनोदने रागाच्या भरात त्याचाच मित्र असलेच्या पप्पु राज याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक वेळा वार केले. यामध्ये पप्पू हा गंभीर जखमी झाला. त्याला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती जास्तीच बिघडल्याने त्याला शीव रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विनोद तिवारी याला अटक केली.