
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना 1 वर्ष कैद व 50 हजार रुपयांचा दंड आकारण्याचा राज्य शासनाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक आहे. कारण शिक्षेच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बंद करतील, तर शासन शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करताना हाल होणार असून, त्यात त्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने आडत व्यापाऱ्याने माल खरेदी केल्यास त्याला 1 वर्ष तुरुंगवास व 50 हजार रुपये दंडाची अशी तरतूद नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळाने केली आहे. बाजार समिती कायद्याच्या कलम 29 अन्वये परवाना रद्द करण्याची तरतूद पूर्वीपासून होतीच त्यात सुधारणा करून त्यात कैदेच्या शिक्षेची व दंडाची भर घातली आहे, असा कायदा झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी बंद करणे सहाजिक आहे.
शेतकऱ्यांकडील सर्व माल खरेदी करण्यासाठी शासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही. गेली दोन वर्ष गोदामे, बारदाना, सुतुळी, काटे, मनुष्यबळाअभावी खरेदी बंद राहिलेली अनेक वेळा राज्याने पाहिली आहे. शासनाला दिलेल्या मालाचे पैसे अनेक महिने मिळत नाहीत हा अनुभव आहे. सरकार दरबारी हेलपाटे मारण्यापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विकलेले परवडते, असे मानून शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विकतात.
भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय
शासकीय खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे जगजाहीर आहे. ग्रेडर, हमाल व यंत्रणेतील इतर कर्मचारी शेतकऱ्याला नाडून पैसे काढतात हा आजवरचा अनुभव आहे. आता व्यापाऱ्यांना हप्ते देण्याची वेळ येणार आहे. त्याची वसुली व्यापारी शेतकऱ्यांकडूनच करणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांची अधिक लूट होणार आहे. सरकारी केंद्रे वेळेत सुरू झाली नाहीत किंवा तातडीने पैशाची गरज असल्यास शेतकरी स्वत: आपले चांगल्या प्रतीचे धान्य नॉन एफ.ए.क्यू. आहे असा दाखला लिहून देऊन माल विकण्यास मजबूर होणार आहे. शासनाने जाहीर केलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा नाही तसेच शेतकऱ्यांच्याही हिताचा नाही. हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटना व्यापाऱ्यांच्या बरोबर राहील, असेही संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
शिल्लक मालाचे काय?
शासनाला माल विकायचा असेल तर तो एफ.ए.क्यू. दर्जाचाच असला पाहिजे. त्यात किती टक्के आद्रता, किती टक्के खडे, काडी-कचरा, किडके दाणे, रंगहीन दाणे, भिजलेले दाणे वगैरे असे अनेक निकष लावले जातात व बऱ्याच वेळा माल स्वीकारला जात नाही किंवा टपाच्या चाळणी खाली पडतो. हा माल फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. व्यापारी मालाच्या दर्जानुसार भाव ठरवून सर्व माल विकत घेतो व स्वत: वर्गवारी करतो. थोडक्यात शासन फक्त एक्स्पोर्ट क्वॉलिटीचा मालच खरेदी करते बाकी मालाची जवाबदारी घेत नाही.




























































