तापमानवाढ होत राहिली तर केरळपेक्षा भीषण स्थिती होईल – संशोधकांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे १३ लाख लोक बेघर झाले आहेत. तर या आपत्तीत ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. या शतकातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी केरळमध्ये झाला असून या आपत्तीने राज्याचे प्रंचड नुकसान झाले आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर अशा नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही असा इशारा संशोधकांनी दिला आहे. केरळमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अडीचपट पाऊस पडला असून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. जागतिक तापमानवाढ नियंत्रणात आणली नाही तर केरळपेक्षा भीषण नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नेमके कारण शोधणे कठीण आहे. मात्र, गेल्या ६७ वर्षात देशातील काही भागात पावसाच्या प्रमाणात तीनपट वाढ झाल्याचे संशोधकांनी सांगितले. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात भीषण दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो असेही संशोधकांनी म्हटले आहे.

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीमुळे हिंदुस्थानातील सरासरी तापमान दीड ते तीन अंशांनी वाढण्याची भीती जागतिक बँकेच्या ‘साऊथ एशिया हॉटस्पॉट’ या अहवालात व्यक्त केली आहे. जागतिक तापमान वाढीविरोधात योग्य पावले उचलली नाहीत, तर अनियमीत पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे देशाचा जीडीपी २.८ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच २०५० पर्यंत देशातील सुमारे ५० टक्के जनतेला याचा फटका बसणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक बदलांमुळे हिंदुस्थानचे सरासरी तापमान वाढणार आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.