
सामना प्रतिनिधी । देवगड
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री कुणकेश्वर तीर्थस्थानी तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. दर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने दर्शन व्यवस्था व पार्कींगचा आराखडा बनविण्यात आला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धरतीवर या वर्षी भाविकांना रांगेची व्यवस्था करण्यात आली असून कुणकेश्वर श्रावणी सोमवार निमित्त भक्तिचा मळा फुलला होता. हळू हळू भाविकांची पाऊले कुणकेश्वर नगरीत पडू लागली असून याठिकाणी देवस्थान ट्रस्ट तसेच प्रशासनाच्या वतीने भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चोख काळजी घेतली जात असल्याचे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी सांगितले.
या तिसऱ्या श्रावण सोमवारी उद्योगपती नंदकुमार घाटे, लोकप्रतिनिधी व अन्य भाविकांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे भाविक भक्तांचे सुखसोईंच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टने दर्शन रांग, पावसाळी मंडप व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच समुद्रकिनारी पोलीस बंदोबस्त तसेच देवगड-तारामुंबरी मिठमुंबरी पूलावरून मार्ग चालू झाल्याने ठिकठिकाणी ट्राफिक पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. संपूर्ण दिवसभर सुस्वर भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री कुणकेश्वर मंदिर मध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये दिपोत्सव व फुलांची आरास करण्यात आली असून तसेच भाविक भक्तांना थेट दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक भक्तांना करावयाच्या पूजाविधी मंदिराचे ध्यानग्रहाचे ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र देवस्थानचे रितीरिवाजाप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारी देवस्थानची वार्षिके पाहता गोकुळाष्टमी या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने त्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला भाविक भक्तांना मंदिरामध्ये अभिषेक, एकादशणी व लघुरूद्र सारखे पुजाविधी करता येणार नसल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी सांगितले.






























































